ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने एक मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत आज शहरात विविध ठिकाणी मोकाट आढळलेली १४ जनावरे नगर परिषदेच्या पथकाने जप्त केली. या सर्व जनावरांना पुढील संगोपनासाठी तातडीने हळदा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
नगर परिषद प्रशासनाने या कारवाईच्या आठ दिवस आधीच शहरात वृत्तपत्राच्या माध्यमातून पूर्वकल्पना दिली होती. शहरातील रस्ते किंवा सार्वजनिक जागांवर आढळणारी जनावरे ही बेवारस समजून ताब्यात घेतली जातील, असा इशारा प्रशासनाने आधीच दिला होता. या इशाऱ्याची मुदत संपताच नगर परिषदेने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांवर महाराष्ट्र महानगरपालिका/नगर परिषद कायदा तसेच इतर लागू असलेल्या शासकीय नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नियमानुसार आवश्यक भासल्यास या जनावरांचा जाहीर लिलाव देखील करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी शहरातील सर्व पशूमालकांना कडक शब्दांत चेतावणी दिली आहे. पशूमालकांनी आपल्या गायी, बैल व इतर जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे. या आवाहनानंतरही निष्काळजीपणा केल्यास संबंधित जनावरांवर होणाऱ्या दंडात्मक किंवा लिलावाच्या कारवाईस मालक स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी व पशूमालकांनी नगर परिषद प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी नगर परिषद ब्रह्मपुरीच्या वतीने केले आहे.






















