सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा
सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने आजपासून गावागावांत जनजागृती अभियानाला सुरुवात केली असून या अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिली बैठक सकाळी साडेआठ वाजता मनेगाव येथे पार पडली. ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा जाहीर करत बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि भजनी मंडळांसह ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली.
यानंतर गोंदे येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी क्रांती दिनी हजारोंच्या संख्येने चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढे माळवाडी, दोडी, चास आणि नळवाडी येथेही बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक गावात महिला, युवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच विविध सामाजिक संघटनांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा कणा असल्याचे स्पष्ट केले. सिन्नर एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून उद्योग, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. या रेल्वेमुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जनजागृती दौऱ्यात हरिभाऊ तांबे, बबन वाजे, प्रा. राजाराम मुंगसे, राजाराम मुरकुटे, संजय सोनवणे, बंडू नाना भाबड, जगन पाटील भाबड, कॉ. कारभारी पाटील उगले, संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंदा वरपे, सुभाष सांगळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
दरम्यान, सिन्नर तालुका वकील संघाने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SIMA) तसेच तालुक्यातील विविध सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संघटनांनीही सक्रिय सहभागाची घोषणा केली आहे.
गावागावांत मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे येत्या ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक–पुणे महामार्गावर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचा विश्वास रेल्वे कृती समितीने व्यक्त केला आहे. महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केल्याने हे आंदोलन आता सर्वपक्षीय, सर्वसमावेशक आणि जनआंदोलनाच्या स्वरूपात पुढे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.






















