गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम ( एस . आय . आर . ) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून बीड तालुक्यातही हे अभियान वेगाने राबविण्यात येत आहे . मतदार यादी अधिक अचूक , अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू ठेवले असून अधिकारी , कर्मचारी , बी . एल . ओ . आणि नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळे कामाला मोठी गती मिळत आहे .
०५ ऑगस्ट रोजी दुपारी २ . ०० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बीड तालुक्यातील ४ लाख ३६ हजार ५६७ मतदारांपैकी ४ लाख २९ हजार ६६५ गणना पत्रांचे वितरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ९८ . ४२ टक्के इतके आहे . तसेच ३ लाख ४७ हजार ५२५ गणना पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून एकूण प्रगती ९३ . ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे . बीड विधानसभा मतदारसंघातही ९२ . ९२ टक्के एकूण प्रगती नोंदविण्यात आली असून जिल्हाभर विशेष पुनरीक्षण अभियान अंतिम टप्प्यात दाखल झाले आहे .
विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात विशेष नियोजन करण्यात आले आहे . प्रत्येक मतदान केंद्रावर बी . एल . ओ . यांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून गणना पत्रांचे वितरण , पडताळणी आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली . यावेळी सहायक महसूल अधिकारी श्रीराम वायभट यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . मतदान केंद्रावर उपलब्ध नोंदी , गणना पत्रांचे वितरण , नागरिकांची उपस्थिती , डिजिटायझेशनची स्थिती तसेच उर्वरित कामाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला . कामामध्ये अचूकता राखून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही , याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या .
या केंद्रांवर बी . एल . ओ . सारिका चौहान आणि समाजसेवक सय्यद एजाज अली यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून गणना पत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ केली . नागरिकांच्या शंकांचे तत्काळ निरसन करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली . त्यामुळे अनेक मतदारांनी त्याच ठिकाणी आपली प्रक्रिया पूर्ण केली . तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की , विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही केवळ निवडणूक प्रक्रिया नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण अभियान आहे . प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप गणना पत्र सादर केलेले नाही किंवा आवश्यक माहिती अद्ययावत केलेली नाही , त्यांनी उर्वरित मुदतीत तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी . बी . एल . ओ . यांना आवश्यक सहकार्य करून मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा , असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी उपस्थित नागरिकांनीही विशेष पुनरीक्षण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक केले . समाजसेवक सय्यद एजाज अली , अझहर मोमीन , शेख इम्रान , सय्यद आसिफ अली , सय्यद माजीद जमा , नबील जमा यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते . त्यांनी मतदारांनी स्वतः पुढाकार घेऊन गणना पत्रे भरावीत आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे , असे आवाहन केले .
महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की , विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी आणि बी . एल . ओ . उपलब्ध असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे . मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत बी . एल . ओ . किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी . सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट व्हावीत आणि लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम व्हावी , यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.






















