निफाड | दि. ४ ऑगस्ट चांदोरी, सायखेडा व गोदावरी नदीकाठच्या परिसरातील गावांना दरवर्षी उद्भवणाऱ्या पुराच्या संकटातून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, तसेच सायखेडा पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी गोदावरी नदीला पूर आल्याने चांदोरी, सायखेडा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. यामुळे शेतकऱ्यांचे पीक, घरे, जनावरे व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होत असून नागरिकांना सतत भीतीच्या वातावरणात जीवन जगावे लागत आहे.
तसेच सायखेडा पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवून संरक्षण भिंती उभाराव्यात, नदीपात्र सुधारणा करावी, आवश्यक ठिकाणी बंधारे उभारावेत आणि सायखेडा पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत व चांदोरी व परिसरातील नागरिकांना पुराच्या संकटातून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे, निफाड तालुका अध्यक्ष सचिन हिरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, दिंडोरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, अक्षय बागुल, निखिल सुतार, संकेत चव्हाण, ऋतेश गवई, आदित्य निर्भावणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.























