ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्ट्र राज्याच्या आवाहनानुसार, ब्रह्मपुरीत वैद्यकीय यंत्रणेने बेमुदत बंद पुकारला आहे. ‘रुग्णांची सुरक्षितता – आमची जबाबदारी’ असे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या या आंदोलनामुळे ब्रह्मपुरी शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडी, आयपीडी आणि आपत्कालीन सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता कायदेशीररीत्या ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची दारे खुली होणार आहेत. ‘आयएमए’च्या मते, हा निर्णय आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा पाया कमकुवत करणारा असून, ही सरळ-सरळ ‘मिक्सोपॅथी’ वैद्यकीय पद्धतींची सरमिसळ आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाही शासनाने तडकाफडकी पहिले नोंदणी प्रमाणपत्र जारी केल्यामुळे, ‘आयएमए’ ब्रह्मपुरी शाखेने पुढील आदेशापर्यंत संप पुकारला आहे
“आमचा विरोध कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा वैद्यकीय पॅथीविरुद्ध नाही, तर हा लढा शास्त्रीय वैद्यकीय मानदंडांच्या रक्षणासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आहे. चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय परवाने दिल्यास जनतेच्या आरोग्यावर त्याचे दूरगामी आणि घातक परिणाम होऊ शकतात,” अशी स्पष्ट भूमिका आंदोलक डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’ शी बोलताना मांडली. आज होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही नागरिकांची मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, मात्र गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी जनतेने या संघर्षात सहकार्य करावे, असे आवाहन ‘आयएमए’
ब्रह्मपुरी शाखेतर्फे करण्यात आले आहे.





















