दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड) दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत एकूण सात गुन्हे दाखल केले आहेत.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दौंड शहरातील दौंड भाजी मंडई, गांधी चौक परिसर तसेच दौंड-पाटस रोडवरील वायरलेस फाट्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार चार गुन्हे, तर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत १४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून,x त्यामध्ये दौंड शहर व परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये हिरो कंपनीची HF Deluxe मोटारसायकल, होंडा कंपनीची Activa (क्रमांक MH42-BV-6441) आणि हिरो HF Deluxe (क्रमांक MH42-AY-8454) यांचा समावेश आहे.
दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच मद्यपान करून वाहन चालविणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त व विशेष कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये आणि मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्यास नागरिकांनी दौंड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






















