शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई
विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींना मिनी मोबाईलच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जळगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने उघडकीस आणला आहे. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सजग’ मोहिमेदरम्यान ही बाब समोर आली.
साध्या वेशातील पाळतीतून उघड झाला प्रकार
जिल्ह्यातील एका मुलींच्या शाळेबाहेर गेल्या काही दिवसांपासून दामिनी पथकातील महिला अंमलदार साध्या वेशात पाळत ठेवून होत्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत असताना काही व्यक्ती विद्यार्थिनींना छुप्या पद्धतीने लहान आकाराचे मोबाईल विकत असल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थिनींकडून मिनी मोबाईल जप्त
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दामिनी पथकाने तातडीने कारवाई करत काही विद्यार्थिनींकडून मिनी मोबाईल जप्त केले. त्यानंतर शाळा प्रशासन आणि संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. जप्त केलेले मोबाईल पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पालकांनी अधिक सतर्क राहावे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलाने पालकांना आपल्या पाल्यांच्या हालचाली, मोबाईल वापर आणि मैत्रीच्या संबंधांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधून त्यांना सायबर फसवणूक, अनोळखी व्यक्ती आणि अशा प्रलोभनांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
संशयित दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा
शाळांच्या परिसरात, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या ये-जा मार्गावर, एसटी स्थानक, रिक्षा थांबे किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी लहान मोबाईल विकणाऱ्या अथवा संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा जळगाव पोलीस दलाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






















