सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने सन २०२५-२६ करिता वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढविणे, गळती रोखणे आणि केवळ पात्र व जीवंत शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचविणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
राज्यात २० मे २०२६ पासून ई-केवायसीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
शेतकरी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर (सीएससी) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे अथवा ‘पीएम-किसान’ मोबाईल अॅप डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. या दोन सोप्या पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरून प्रमाणिकरण करता येणार आहे.
वृद्ध, आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या लाभार्थ्यांसाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी (सहाय्यक कृषी अधिकारी) विशेष मदत करणार आहेत. अशा लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया फेस ऑथेंटिकेशनद्वारे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी वैयक्तिकरीत्या सहकार्य करणार आहेत.
सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ३० जून २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, सिन्नर . ज्ञानेश्वर नाठे यांनी केले आहे.






















