वाळूज:(प्रतिनिधी)पांडुरंग गायकवाड
वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
याच परिसरात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून मध्यान्ह भोजनही याच ठिकाणी घेतात. दुर्गंधी, माशा व डासांचा वाढलेला प्रादुर्भाव विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिक व व्यावसायिकांकडून शाळेसमोरच कचरा टाकला जात असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी अधिक वाढली असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
पालक व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने तातडीने कचरा हटवून परिसराची नियमित स्वच्छता करावी तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
स्वच्छ शाळा परिसराची गरज
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छ वातावरण लक्षात घेऊन शाळेच्या परिसरात नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.






















