फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 वर्ल्डकपनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती?
जागतिक फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया अवेरो हिने केलेल्या वक्तव्यानंतर 2026 च्या फिफा विश्वचषकानंतर तो पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेत पोर्तुगाल संघाने राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला असून, पुढील लढत स्पेनविरुद्ध होणार आहे. अशातच रोनाल्डोच्या संभाव्य निवृत्तीची चर्चा रंगू लागल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
रोनाल्डोच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद झाली असली, तरी त्याला अद्याप फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे हा त्याचा अखेरचा विश्वचषक ठरला, तर पोर्तुगालने विजेतेपद पटकावावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
कटिया अवेरोने काय सांगितले?
41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या कारकिर्दीत सहाव्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तो सध्या अल-नासर क्लबकडून क्लब फुटबॉल खेळत आहे. विश्वचषकानंतर तो क्लब फुटबॉल सुरू ठेवेल, मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होईल, अशी चर्चा यापूर्वीही होती.
यावर शिक्कामोर्तब करताना कटिया अवेरोने एका क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, “हा प्रवास सुरू आहे तोपर्यंत त्याचा मनापासून आनंद घ्या. हा प्रवास आता संपण्याच्या अगदी जवळ आला आहे. मला अत्यंत विश्वासार्ह सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, हा रोनाल्डोचा ‘लास्ट डान्स’ असेल.”
विश्वचषक 2026 मध्ये रोनाल्डोने आतापर्यंत तीन गोलांची नोंद केली आहे. साखळी फेरीत उझबेकिस्तानविरुद्ध दोन गोल, तर बाद फेरीतील सामन्यात क्रोएशियाविरुद्ध एक गोल करत त्याने आपल्या संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे.
2030 विश्वचषकातील सहभागाच्या चर्चेलाही पूर्णविराम?
यापूर्वी पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेज यांनी रोनाल्डोच्या फिटनेसचे कौतुक करत तो 2030 च्या फिफा विश्वचषकातही खेळू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पेड्रो प्रोएंका यांनी या मताशी असहमती दर्शवली.
त्यांच्या मते, 2030 च्या विश्वचषकात रोनाल्डो खेळेल, ही शक्यता अत्यंत कमी असून तसे घडल्यास ते मोठे आश्चर्य ठरेल.
रोनाल्डोच्या संभाव्य निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी कटिया अवेरोच्या वक्तव्यानंतर 2026 विश्वचषक हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा अध्याय ठरण्याची चर्चा आता अधिक वेगाने सुरू झाली आहे.






















