Times of Maharashtra Desk, Patna : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी आज सुरू झाली आहे.या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारमध्ये सिंघम अशी ओळख निर्माण केलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या अररिया विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अररिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे शिवदीप लांडे सध्याच्या प्राथमिक कलांनुसार पिछाडीवर आहेत. लांडे यांच्यामुळे या मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. मुख्य लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार अबिदुर रहमान आणि जेडीयूच्या शगुफ्ता अझीम यांच्यात सुरू आहे. जनसुराज्यच्या फरहत आरा बेगम यांच्या उमेदवारीमुळेही या मतदारसंघात रंगत वाढली आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे अबिदुर रहमान आघाडीवर होते तर त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीत शगुफ्ता अझीम यांनी आघाडी घेतली आहे.
कोण आहेत शिवदीप लांडे?
शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी आहेत. ते २००६ च्या बॅचचे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी १८ वर्षे बिहार पोलीस दलात आपल्या धडाकेबाज कामगिरीने सिंघम म्हणून ओळख मिळवली. विशेष म्हणजे लांडे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
शिवदीप लांडे पिछाडीवर असले तरी संपूर्ण निकाल हाती येईपर्यंत त्यांच्या विजयाची उत्सुकता कायम असल्याच त्यांचे समर्थक सांगत आहेत. महाराष्ट्रातील अनेक लोक या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.






















