धीरज महांगरे (पुणे शहर प्रतिनिधी) : हडपसर–मांजरी रोडवरील गोपाळपट्टी येथील उड्डाणपूल सध्या नागरिकांसाठी दिलासा ठरण्याऐवजी गंभीर धोका बनला आहे. गोपाळपट्टी येथील जिल्हा परिषद शाळेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर सुरू होणाऱ्या या उड्डाणपुलावर सुरुवातीच्या तसेच उतरतानाच्या भागातील कठड्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. याच निष्काळजीपणामुळे येथे वारंवार अपघात घडत असून, काही घटनांमध्ये जीवितहानीही झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे.
उड्डाणपुलावर वाहन चढवताना तसेच खाली उतरताना योग्य कठडे नसल्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरते. उड्डाणपूल जिथे चढतो, उतरतो आणि बाजूचा सर्विस रोड या तिन्ही भागांमध्ये समपातळी नसून उंच-खाच असल्याने वाहन चालक गोंधळात पडतात आणि अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाच्या बाजूने असलेल्या सर्विस रोडवर घाणीचे साम्राज्य पसरले असून, उड्डाणपुलाखालील रस्ता अक्षरशः कचराकुंडीमध्ये रूपांतरित झाला आहे. कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. हा उड्डाणपूल वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला होता, मात्र अपूर्ण कामांमुळे तो अपघातांचा सापळा ठरत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) प्रकल्प विभागाकडे तातडीची मागणी केली आहे की, उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या आणि उतरतानाच्या भागातील कठड्यांचे काम त्वरित पूर्ण करावे, रस्त्यांची समपातळी करावी, तसेच उड्डाणपुलाखालील आणि सर्विस रोडवरील कचरा तात्काळ साफ करून परिसर स्वच्छ करावा. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.






















