संघराज गायकवाड,राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) : गोपाळवाडी रोडवरील शेंडे वस्ती परिसरात गोपाळवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सध्या पूर्णपणे बेवारस अवस्थेत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या रस्त्यावर सुरू करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी रस्ता खोदलेला, खचलेला व खडी-मुरूम पसरलेला दिसून येत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी अपघातांचा सापळा ठरत आहे.
सध्या रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ते तसेच सोडून देण्यात आले आहे. ठिकठिकाणी मातीचे ढिग, सैल खडी व उघडे चर असल्यामुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडत असून चारचाकी वाहनांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः संध्याकाळच्या व रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतेही सुरक्षा फलक, बॅरिकेड्स किंवा सूचना नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या कामाच्या ठिकाणी कोणताही संबंधित अधिकारी उपलब्ध नसून कामाची माहिती देणारा प्रकल्प फलकही लावलेला नाही. ठेकेदार घटनास्थळी दिसून येत नसल्यामुळे हे काम नेमके कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता अर्धवट अवस्थेत रस्ता खुला ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
हा रस्ता गोपाळवाडीला जोडणारा मुख्य वाहतूक मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. मात्र निष्कृष्ट कामामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांकडून पाहणी करावी, ठेकेदारावर कारवाई करावी व रस्ता दर्जेदार पद्धतीने त्वरित दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी शेंडे वस्ती परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.






















