Times Of Maharashtra Desk : पुणे- मुंबई महामार्गावर अडोशी बागद्याजवळ प्रेपोलिन या घातक,आणि विस्फोटक रासायनाने भरलेला टँकर उलटून अपघात झाला होता त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या २० किलोमीटरपर्यन्त लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांचे अन्न- पाण्यावाचून अतोनात हाल झाले. अडकून पडलेल्या प्रवाशानी सोबत आणलेली शिदोरी पुरवून पुरवून आपण खाल्ली व आपल्या लेकरा-बाळाना खाऊ घातली. कुणी आपल्या जवळचे जादा अन्न सहप्रवाशाना देऊन माणुसकीचे दर्शन घडविले तर अनेकांनी वाहना बाहेर पडून हास्य,विनोद,गाणी म्हणून वेळेवर मात केली. यात कुणाचे विमान चुकले तर कुणाची नोकरी हुकली. एसटी च्या सुमारे १४० वाहनानाही याची झळ बसली.
अथक प्रयत्नाना अखेर यश
मुंबई–पुणे मार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकर अखेर तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. टँकर हटवण्याची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आलीय. टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसीमधील तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम केले. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा धोका टळला.






















