पुणे: शहरातील रस्त्यांची नेमकी लांबी किती, या साध्या प्रश्नाचे उत्तरही पुणे महापालिकेकडे स्पष्ट नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील रस्त्यांची लांबी ६,८९२ किलोमीटर असल्याचे नमूद केले आहे; तर पथ विभागाच्या अधिकृत नोंदीत हीच लांबी २,३७९.६६ किलोमीटर असल्याचे नमूद आहे. दोन विभागांच्या आकडेवारीतील प्रचंड तफावतीमुळे प्रशासनाच्या समन्वयावर आणि नोंदवहीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या विरोधाभासी आकडेवारीचा परिणाम शहरातील रस्त्यांची स्वच्छता, देखभाल, डांबरीकरण, दुरुस्ती तसेच निधी नियोजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात किती रस्त्यांची साफसफाई होते, किती रस्त्यांवर विकासकामे झाली आणि किती अंतरासाठी निधी खर्च झाला, याबाबत नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने प्रशासकीय कामकाजातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, एकाच शहरासाठी दोन भिन्न आकडे असणे ही केवळ तांत्रिक चूक नसून माहिती व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे सर्व विभागांची आकडेवारी एकसंध करून भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे रस्त्यांची अंतिम नोंद तयार करण्याची गरज आहे.
नागरिकांचाही प्रश्न सरळ आहे.रस्त्यांची लांबीच निश्चित नसताना, रस्त्यांच्या कामांचा आणि खर्चाचा अचूक हिशेब कसा मांडला जाणार? प्रशासनाने या विसंगतीचे तातडीने स्पष्टीकरण देत एकसमान व पारदर्शक आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
“रस्ते किती, याचाच हिशेब नाही; मग खड्डे, स्वच्छता आणि कोट्यवधींच्या कामांचा लेखाजोखा नेमका कोणत्या मोजपट्टीवर?”






















