जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरातील अतिसंवेदनशील व मनाई क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संरक्षण विभागाशी संबंधित संवेदनशील परिसराच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून, पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीचे कनिष्ठ कार्यप्रबंधक अभिजीत गौरनपद नंदी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २३) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास निलेश बळीराम ताटे व राजेंद्र श्रीधर कोळी (दोघे रा. तळवेल, ता. भुसावळ) यांनी आयुध निर्माणीच्या मनाई क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केला. संरक्षण भिंतीलगत संशयास्पद हालचाली करत असताना सुरक्षा रक्षकांच्या ही बाब निदर्शनास आली.
आयुध निर्माणी परिसर हा संरक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने येथे सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास सक्त मनाई आहे. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा चौक्या आणि सशस्त्र सुरक्षा कर्मचारी कायम तैनात असतात. संशयास्पद हालचाली लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली व त्यानंतर वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा मनाई क्षेत्रात जाण्यामागील नेमका उद्देश काय होता, ते तेथे कोणत्या कारणासाठी आले होते, त्यांच्याकडे कोणते साहित्य होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश बळीराम ताटे याच्याविरुद्ध यापूर्वीही वरणगाव पोलीस ठाण्यात हत्यार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या पूर्वइतिहासाचाही तपास केला जात आहे.
देशाच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या मनाई क्षेत्रात घडलेल्या या प्रकाराकडे सुरक्षा यंत्रणा अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल व पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकुळे करीत आहेत.






















