अनिल वायाळ -(बुलढाणा प्रतिनिधी) : लोणार सरोवराच्या काठावरील ऐतिहासिक कमळजा माता मंदीर वाढत्या पाणी पातळीमुळे पूर्णपणे पाण्याच्या वेढ्यात सापडले असतानाही शासन आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप कमळजा माता सेवा संघ व भाविकांनी केला आहे. या मुद्द्यावर प्रशासनाच्या निषेधार्थ आज, रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले.आज उपोषणाचा दूसरा दिवस
लोणार सरोवर परिसरातील कमळजा मातेचे प्राचीन मंदीर पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत असून, गर्भगृहात पाणी साचल्याने मूर्ती व ऐतिहासिक रचना धोक्यात आल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. वारंवार निवेदने देऊनही स्थानिक प्रशासन व संबंधित विभाग केवळ आश्वासनच देत असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी १५ दिवसांत पाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, असे भाविकांनी म्हटले आहे. मंदिराभोवती संरक्षण भिंत उभारण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. पाणी थेट मंदिराच्या बांधकामाला धडकत असतानाही संबंधित विभागाकडून मंजुरी किंवा कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबाबत शासनाची भूमिका संशयास्पद असल्याची टीका होत आहे. मंदिराच्या दैनंदिन पूजाअर्चेसाठी एक चावी विश्वस्त किंवा भक्त मंडळाकडे देण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे. शासन व प्रशासनाच्या कथित उदासीनते विरोधात कमळजा माता सेवा संघाच्या वतीने आजपासून तहसील कार्यालयासमोर सामूहिक साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी समाधान आखाडे, देवांग संचेती आणि महेश नरवाडे यांनी तर आज दुसऱ्या दिवशी गजानन मापारी,शंकर ठाकुर,
रूषी मापारी साखळी उपोषणात सहभाग घेतला.






















