गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला असून रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. १ एप्रिलपासून खतांच्या दरात प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खतांची तयारी सुरू असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकरी उत्पादन खर्चात सुमारे ६ ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, डीएपी व टीएसपी या खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी इतर खतांच्या दरवाढीमुळे एकूण खर्चाचा ताण कायम आहे. बाजारात जुन्या दराचा साठा असतानाही काही ठिकाणी वाढीव दराने विक्री होण्याची शक्यता असून, खत टंचाई व काळाबाजाराची भीतीही व्यक्त होत आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे व दरांची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साठा व विक्रीवर प्रशासनाने कडक नजर ठेवावी, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रमुख खतांची दरवाढ (प्रति बॅग):
- एनपीके : ₹300
- 10:26:26 : ₹225
- 12:32:16 : ₹225
- 14:35:14 : ₹225
- 19:19:19 : ₹225
- एमओपी : ₹125






















