ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची पाळ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटली होती. ही पाळ आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
जुलै २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या तलावाच्या मध्यभागातील पाळ अचानक फुटली होती. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नवेगाव खुर्द आणि मेंडकी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले होते. यामध्ये सुमारे २५ एकरांहून अधिक क्षेत्रातील धान पीक पूर्णतः नष्ट झाले होते. शेतीसोबतच तलावातील मत्स्य व्यवसायाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी साठवणूक होऊ शकली नाही. याचा परिणाम उर्वरित शेतकऱ्यांच्या सिंचनावर झाला असून, पाण्याअभावी अनेकांना पीक घेणे कठीण झाले होते. या घटनेला आता नऊ महिने उलटून गेले आहेत, तरीही प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
पावसाळा तोंडावर, कामाची प्रतीक्षा
आता एप्रिल महिना संपत आला असून पावसाळा जवळ येत आहे. पुन्हा तशीच परिस्थिती ओढवू नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाळीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे नेते प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी या कामासाठी पाठपुरावा सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.






















