गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या निमित्ताने पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्व जाती-धर्मातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. मिरवणुकीदरम्यान बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये तरुणांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास सरपंच शशिकलाबाई कांबळे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, मनोज हजारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा संघटक प्रदीप तुरुकमारे, उपसरपंच गजानन मोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील जेष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिम वादळ ग्रुप, सुशी (व) तसेच गावातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत जयंती उत्साहात साजरी केली.






















