गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायप्रवेशाला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि तहसील कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि 16 मे रोजी तहसील कार्यालय परिसरात ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, अण्णा वंजारे, विधीदूत अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, महसूल सहाय्यक हेमलता परचाके, वैशाली बहिरवाळ, महेंद्र राऊत तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी, हक्कांचे संरक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. वहाब ए. सय्यद यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा योजना-२०१६ अंतर्गत वृद्धांना मोफत कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता, वारसा, कौटुंबिक वाद, निवृत्तीवेतन, आर्थिक फसवणूक आणि विविध शासकीय योजनांबाबत अडचणी येतात. अशा वेळी हे सुविधा केंद्र त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना कोणालाही ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा बायोमेट्रिक माहिती देऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले. डिजिटल युगात जागरूकता आणि सतर्कता हीच सर्वात मोठी सुरक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या केवळ कायदेशीर स्वरूपाच्या नसून त्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक स्वरूपाच्याही असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून सुरू झालेले हे केंद्र ज्येष्ठांसाठी विश्वासाचे व्यासपीठ ठरेल. कोणत्याही प्रकारची अडचण, अन्याय किंवा शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन हवे असल्यास ज्येष्ठ नागरिकांनी संकोच न बाळगता या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी संदेश दिला की, शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी बीडचे जिल्हाधिकारी वेळोवेळी सुचना देत असतात . अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात, त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. या सुविधा केंद्रामुळे त्यांना आवश्यक माहिती, अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन, तक्रार निवारण, कायदेशीर सल्ला आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तत्त्वशील कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरगुती वाद, मालमत्ता विषयक प्रश्न, देखभाल हक्क, निवास, आरोग्य आणि इतर कायदेशीर समस्यांबाबत विधीदूतांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणी दडवून न ठेवता संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर! डॉ. स्वप्ना घोळवे आणि डॉ. भिसे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. या सुविधा केंद्रामुळे कायदेशीर मदत, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक सहाय्य, तक्रार निवारण आणि विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांची विविध कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मोठी सुटका होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णा वंजारे यांनी मानले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधीदूत, विधी महाविद्यालयाचे पीएलव्ही आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायप्रवेशासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून गरजू ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.























