जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन, अंबरनाथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “लेवा चषक 2026” बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा रविवार, दि. 14 जून 2026 रोजी अंबरनाथ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली.
अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेल्या लेवा समाज बांधवांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा ठरली. या स्पर्धेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल 75 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी आपली क्रीडा कौशल्ये दाखवत स्पर्धेची रंगत वाढविली.
स्पर्धेचे उद्घाटन वराडे बिल्डर्सचे संचालक श्री. विजय वराडे तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री. तुकाराम नेहेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विजय वराडे यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत समाजात अशा क्रीडा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खान्देश सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री. नितीनदादा जावळे व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सौ. कामिनीताई जावळे यांच्या हस्ते पार पडला. मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.
लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनतर्फे स्पर्धेस आर्थिक तसेच प्रत्यक्ष स्वरूपात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचे आयोजकांनी नमूद केले.
बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून समाजातील युवा पिढीमध्ये क्रीडाप्रेम वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किरण नेमाडे, भूषण चौधरी, रुपेश धांडे, लोकेश चौधरी, विशाल खाचणे, कृष्णा महाजन, दीपक फालक, प्रतीक वराडे, पंकज नारखेडे, तुषार पाटील, नीरज चौधरी, राहुल पाटील, कौस्तुभ धांडे, प्रशांत पाटील, वैशाली पाटील, वैभव जावळे, हितेश पाटील, प्रथमेश वराडे, दुश्यंत नारखेडे आणि ध्रुव धांडे यांनी अथक परिश्रम घेतले.
“हार-जीत हा खेळाचा एक भाग असला तरी समाजाला एकत्र आणणे, क्रीडाभावना वृद्धिंगत करणे आणि एकोप्याचे नाते अधिक दृढ करणे हेच ‘लेवा चषक 2026’ चे खरे यश ठरले,” अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.
या यशस्वी स्पर्धेमुळे लेवा समाजात क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून भविष्यात अशा आणखी स्पर्धांचे आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.






















