सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर – एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत एक हजारांहून अधिक फळझाडांच्या रोपांचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या अंगणात किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमात जांभूळ, बेल, चिंच, आंबा आणि आवळा यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक फळझाडांच्या रोपांचा समावेश करण्यात आला आहे.
सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि हरित नाशिक घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सागर देशमुख यांनी दिली. केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतःहून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजीव नगर येथील हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन लिपने, राहुल सूर्यवंशी, धिरज खैरनार, प्रतीक फड, राम राजगिरे, सनी कुलकर्णी, मयूर औटे, संदीप सोनवणे, नानासाहेब आढाव यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.






















