नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर भर देत असल्याचे Avendus Wealth-Hurun India U30 List 2026 या अहवालातून समोर आले आहे.
अहवालानुसार, या युवा उद्योजकांनी उभारलेल्या एकूण भांडवलापैकी ५३ टक्के निधी उत्पादन विकास (२७%) आणि बाजारपेठ व भौगोलिक विस्तार (२६%) यासाठी खर्च केला आहे. त्यामुळे अल्पकालीन यशापेक्षा टिकाऊ व्यवसाय उभारण्यावर नव्या पिढीचा भर असल्याचे स्पष्ट होते.
Hurun India चे संस्थापक व मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी सांगितले की, “या पिढीचे वैशिष्ट्य केवळ त्यांनी उभारलेल्या निधीच्या प्रमाणात नाही, तर त्या निधीचा शिस्तबद्ध वापर करण्यात आहे. हे उद्योजक पुढील निधी उभारणीसाठी नव्हे, तर पुढील दशकाचा विचार करून व्यवसाय उभारत आहेत.”
अहवालानुसार, BharatPe ने सर्वाधिक १८ फंडिंग फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर Simple Energy आणि Zepto यांनी प्रत्येकी १५, Pixxel ने ११, तर Baaz Bikes ने ९ फंडिंग फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
यंदाच्या यादीतील सर्वाधिक निधी उभारणाऱ्या स्टार्टअपमध्ये Zepto अव्वल असून कंपनीने आतापर्यंत २.३ अब्ज डॉलर उभारले आहेत. त्यानंतर BharatPe ने ६५० दशलक्ष डॉलर, तर Simple Energy ने ९९ दशलक्ष डॉलर निधी उभारला आहे.
अंतराळ तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपनाही मोठी गुंतवणूक मिळाली आहे. Pixxel ला ९६ दशलक्ष डॉलर, Klarity ला ९० दशलक्ष डॉलर, Wispr AI ला ८१ दशलक्ष डॉलर, Digantara ला ६७ दशलक्ष डॉलर, Swish ला ५४ दशलक्ष डॉलर, तर Triomics ला ५१ दशलक्ष डॉलर निधी प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, Avendus Wealth-Hurun India U30 List 2026 मधील सर्वात तरुण १० उद्योजकांचे वय २४ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे. Apolink चे ओंकार सिंग बत्रा आणि Supermemory चे ध्रव्य शाह हे केवळ २० वर्षांचे असून यादीतील सर्वात तरुण उद्योजक ठरले आहेत. तसेच Zepto चे सहसंस्थापक आदित पालीचा आणि कैवल्य वोहरा हे वयाच्या २३व्या वर्षी या यादीत स्थान मिळवणाऱ्या प्रमुख युवा उद्योजकांमध्ये आहेत.






















