नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी ‘युजरनेम’ (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. मात्र या नव्या फीचरचा गैरवापर होऊन सरकारी संस्था, बँका, कंपन्या किंवा इतर विश्वासार्ह संस्थांच्या नावाने तोतयागिरी (Impersonation) आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या फीचरचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्यक्ती सरकारी विभाग, कायदा अंमलबजावणी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपन्यांसारखे भासणारे युजरनेम तयार करून नागरिकांची दिशाभूल करू शकतात. अशा प्रकारच्या बनावट ओळखींचा वापर आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे किंवा चुकीची माहिती पसरवण्यासाठी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या फीचरचा राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेवर होणारा परिणाम सरकार बारकाईने तपासत आहे.
सूत्रांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. फीचर लागू झाल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सरकार संबंधित यंत्रणांशी चर्चा करणार आहे.
दरम्यान, मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नुकतीच या फीचरची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, युजरनेम फीचरमुळे वापरकर्त्यांना आपला मोबाईल क्रमांक न देता इतरांशी संपर्क साधता येईल. विशेषतः ग्रुप चॅट किंवा नवीन व्यक्तींशी संवाद साधताना ही सुविधा गोपनीयतेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
व्हॉट्सॲपने या फीचरसाठी सुरुवातीच्या टप्प्यात युजरनेम आरक्षित (Reserve) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, हे फीचर यावर्षी अधिकृतपणे सर्व वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा आढावा महत्त्वाचा मानला जात असून, गोपनीयता आणि सुरक्षितता यामध्ये समतोल राखण्याचे मोठे आव्हान व्हॉट्सॲपसमोर असणार आहे.






















