गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली प्रत्यक्ष भेट ; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस आय आर ) – २०२६ कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक , पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हाभर घरपोच गणना प्रपत्र ( एनुमरेशन फॉर्म ) वाटप मोहिमेला प्रारंभ झाला आहे .
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात मोहिमेला गती देण्यात आली आहे . दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः बीड शहरात प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन या अभियानाचा शुभारंभ केला होता . त्यांनी नागरिकांना गणना प्रपत्रांचे वाटप करत मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते . त्याच अभियानाचा भाग म्हणून बीड तालुक्यातील गवळवाडी येथे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला . यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत गणना प्रपत्रांचे वितरण केले आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदार यादीत समावेश होणे ही लोकशाही बळकट करण्याची मूलभूत गरज असल्याचे स्पष्ट केले .
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओमार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येत आहे . या माध्यमातून मतदारांची माहिती अद्ययावत करणे , नव्या छायाचित्रांची नोंद करणे , मॅपिंगमधील त्रुटी दूर करणे , आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्याचे काम केले जात आहे . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी या मोहिमेत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत . तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी प्रत्येक गणना प्रपत्र काळजीपूर्वक तपासून अचूक माहितीची नोंद करण्यावर भर दिला असून उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करून ही लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करावी , असे आवाहन केले आहे .
गवळवाडी येथे झालेल्या भेटीदरम्यान तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे सविस्तरपणे स्पष्ट केली . घराघरात जाऊन बीएलओमार्फत गणना प्रपत्र भरले जाणार असून त्यामध्ये नाव , पत्ता , जन्मतारीख , मोबाईल क्रमांक , आधारविषयक माहिती , छायाचित्र आणि इतर आवश्यक तपशील अचूकपणे देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि प्रत्येकाची माहिती योग्य स्वरूपात नोंदविली जावी , यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन त्यांनी केले . तसेच बीएलओ आणि महसूल कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे आणि ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी करावी , अशा सूचनाही त्यांनी दिल्या .
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश मस्के , सरपंच बाळासाहेब मस्के , ग्राम महसूल अधिकारी बंडू आगलावे , बीएलओ श्रीमती पाचरणे , ग्रामपंचायत सदस्य भागवत मस्के , पांडुरंग गणपती मस्के , पोलीस पाटील आदित्य मस्के , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राहुल मस्के , ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद सुंदर मस्के , अरुण मस्के , सुदाम साहेबराव शिंदे , गोवर्धन मस्के , भरत मस्के , रुद्राक्ष काळे , सुंदर मस्के , बालाजी काळे , बंडू मस्के , हरिदास मस्के , शिवचरण मस्के , श्रावण मस्के तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थित नागरिकांनी गणना प्रपत्र भरून देण्याच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अचूक , पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली .
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बीएलओमार्फत घरभेटी सुरू असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून गणना प्रपत्र भरून घेण्यावर भर देण्यात येत आहे . आगामी निवडणुकांसाठी अधिक अचूक , अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ती प्रभावीपणे राबविण्यात येत आहे . प्रत्येक नागरिकाने गणना प्रपत्र वेळेत भरून द्यावे , आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि बीएलओंना सहकार्य करून लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



















