शिरपूर, धुळे :(प्रतिनिधी)तुषार शेटे
कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय शामकांत निकम (वय २१) याची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर धनंजयने हे उल्लेखनीय यश संपादन केले.
धनंजयने सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळविले. त्याला प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सागर कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे धनंजयने भारतीय सैन्यात प्रवेशाचे आपले स्वप्न साकार केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने धनंजय निकम यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे सर्व मान्यवर, व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याला शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा मिस्त्री यांनी धनंजय निकम व त्यांच्या आई माया निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमास शाळेचे समन्वयक श्री. सागर वाघ, प्राचार्य पी आर पाटील, क्रीडा सल्लागार डॉ.लिंबाजी प्रताळे, क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे, प्रशिक्षक हेमंत शिरसाठ तसेच कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी धनंजयच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील सैनिकी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामधून अनेक युवक भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि पोलीस सेवेत यशस्वीपणे निवड होत असून, धनंजय निकमच्या यशामुळे केंद्राच्या यशस्वी वाटचालीत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे.



















