सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक व व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
विशेषतः प्रमुख रस्ते, चौक आणि दुकानांसमोर उभारण्यात आलेल्या बॅनरमुळे ग्राहक, पादचारी व वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी लोखंडी पाईपचे सांगाडेही उभारण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या सिन्नरमध्ये पाऊस व वादळी वाऱ्याचे वातावरण असल्यामुळे हे बॅनर किंवा सांगाडे कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बॅनरबाजीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी जाहिरातीचे फलक उभारण्यासाठी संबंधित परवानगी आवश्यक असते. त्यामुळे सिन्नर शहरातील बॅनरबाजीची तपासणी करून अनधिकृत फलक हटवावेत आणि सार्वजनिक रस्ते व पदपथ अडथळामुक्त ठेवावेत, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.






















