तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पाली येथे पाहणी , जय हिंद कॅम्पसमधील विशेष शिबिरालाही नागरिकांची मोठी गर्द
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) – २०२६ अभियानाला बीड तालुक्यात दिवसेंदिवस गती मिळत असून शहरासह ग्रामीण भागातील विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरे , घरभेटी व जनजागृतीच्या माध्यमातून मतदार गणना प्रपत्र भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .

एस . आय . आर . अभियानाअंतर्गत यापूर्वी मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले असून आता प्रत्येक भाग यादीनिहाय पात्र मतदारांकडून गणना प्रपत्र ( ई एफ फॉर्म ) भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे . मतदार यादी अधिक अचूक , अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बी . एल . ओ . कार्यरत असून शहर व ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे . याच अनुषंगाने बीड शहरातील जय हिंद एज्युकेशन कॅम्पस , मिल्लत नगर येथे प्रभाग क्रमांक १९ , २० , २१ व २२ मधील मतदारांसाठी दोन दिवसीय विशेष एस . आय . आर . शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून संबंधित बी . एल . ओ . कडे आपली गणना प्रपत्रे भरून दिली . संबंधित प्रभागांतील सर्व बी . एल . ओ . एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे मतदारांची मोठी सोय झाली असून प्रपत्र भरणे , आवश्यक कागदपत्रांची पडताळणी , त्रुटींची पूर्तता तसेच मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम प्रभावीपणे पार पडत आहे . या विशेष शिबिरामुळे शहरातील एस . आय . आर . अभियानाला मोठी गती मिळाली आहे .
दरम्यान , ग्रामीण भागातही प्रशासनाने विशेष शिबिरांच्या माध्यमातून अभियान अधिक प्रभावी केले असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली येथील विशेष एस . आय . आर . शिबिरास भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली . यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी , महसूल कर्मचारी व उपस्थित नागरिकांशी संवाद साधून प्रपत्र भरण्याची प्रक्रिया अधिक वेगाने आणि अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या . प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून कोणताही मतदार वंचित राहणार नाही , याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले .
पाली येथील शिबिरात गणना प्रपत्र भरणे , आवश्यक कागदपत्रांची पडताळणी , माहितीतील त्रुटी दूर करणे तसेच मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम सुरू होते . मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून आपली प्रक्रिया पूर्ण केली . बी . एल . ओ . प्रत्यक्ष उपलब्ध असल्यामुळे मतदारांचा वेळ वाचला असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले .

उपविभागीय अधिकारी कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी विविध विशेष शिबिरांना भेट देऊन उपलब्ध व्यवस्थेची पाहणी केली . त्यांनी बी . एल . ओ . व नागरिकांशी संवाद साधत प्रपत्र अचूक भरून घेण्याबाबत सूचना केल्या . प्रत्येक पात्र मतदाराने विलंब न करता एस . आय . आर . ची प्रक्रिया पूर्ण करावी , असे आवाहन त्यांनी केले . जय हिंद कॅम्पसमध्ये झालेल्या विशेष शिबिरास जय हिंद एज्युकेशन कॅम्पसचे सचिव तथा सभापती शेख निजाम जैनुद्दीन , नगरसेवक खय्युम इनामदार , रईसभाई , इलियासभाई , मुन्नाभाई इनामदार यांच्यासह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होऊन आपली गणना प्रपत्रे भरून देण्याचे आवाहन केले . तसेच रविवार रोजीही जय हिंद कॅम्पसमध्ये विशेष शिबिर सुरू राहणार असून संबंधित प्रभागांतील सर्व बी . एल . ओ . नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली .
११ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार बीड तालुक्यात एकूण ४ लाख ३६ हजार ५६७ मतदारांपैकी २ लाख ५५ हजार ७० मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण पूर्ण झाले असून वितरणाची टक्केवारी ५८ . ४३ इतकी झाली आहे . तसेच ७२ हजार ४३० प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून डिजिटायझेशनची टक्केवारी १६ . ५९ आहे . एकूण कामकाजाची प्रगती ३७ . ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून विशेष शिबिरे , घरभेटी आणि लोकसहभागामुळे या कामाला सातत्याने वेग मिळत आहे
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सर्व बी . एल . ओ . ना दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देत ज्या भागात कामाची गती कमी आहे तेथे विशेष जनजागृती , घरभेटी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले . मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक असून कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये , यासाठी महसूल प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले .
उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही नागरिकांना आवाहन केले की , ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र भरलेले नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या बी . एल . ओ . शी संपर्क साधावा अथवा जवळच्या विशेष शिबिरास भेट देऊन एस . आय . आर . ची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी . शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन मतदार यादी अधिक अचूक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे , असेही त्यांनी नमूद केले .
यामुळे शहरातील जय हिंद कॅम्पस विशेष शिबिर आणि ग्रामीण भागातील विशेष शिबिरे यांच्या माध्यमातून बीड तालुक्यातील एस . आय . आर . अभियानाला अपेक्षित वेग मिळत असून आगामी काही दिवसांत प्रगतीत आणखी मोठी वाढ होईल , असा विश्वास महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.






















