ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि रुग्णांशी होणारे गैरवर्तन याविरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने यात त्वरित सुधारणा न केल्यास थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा युवा मोर्चाने दिला आहे.
ब्रह्मपुरी शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, सध्या औषध वाटप केंद्रावर रुग्णांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. खिडकीबाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही, संबंधित कर्मचारी वेळेवर जागेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे आधीच आजारपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या वृद्ध नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांशी अत्यंत उद्धट आणि अयोग्य पद्धतीने वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. हक्काची औषधे मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा नियमित आणि पुरेसा उपलब्ध ठेवावा.औषध वाटप केंद्रात रुग्णांची गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.सर्व कर्मचाऱ्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नम्रतेने व संवेदनशीलतेने वागण्याच्या सक्त सूचना द्याव्यात.
“गरीब रुग्णांची होणारी अडवणूक आता सहन केली जाणार नाही. रुग्णांच्या समस्या सुटल्या नाहीत, तर भाजप युवा मोर्चा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.निवेदन देताना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित रोकडे, उपाध्यक्ष बंटी येरावार, अक्षय झुरमुरे, भरत सावकार, विवेक गरफडे, सचिव निखिल प्रधान, कृष्णा मेहेर, अखिलेश नागपूरकर, कोषाध्यक्ष रोशन कावळे, सदस्य शुभम बोरसरे, दीपक कावळे, यश वाघाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















