सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा रेस्टॉरंटचे बहिरू शेठ गोसावी यांनी आपल्या कृतीतून “हो, प्रामाणिक माणसं आजही आहेत” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अटकवडे येथील शेतकरी मल्हारी वाघ हे ६ ऑगस्ट रोजी सिन्नर येथील श्री दत्त कृपा भजी रेस्टॉरंटमध्ये आले होते. नाश्ता करून घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ५० हजार रुपये असलेली बॅग तेथेच विसरली आहे. लागवडीच्या हंगामात एवढी मोठी रक्कम हरवल्याने शेतकरी आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे हवालदिल झाले.
आजच्या काळात अशा परिस्थितीत पैसे परत मिळतील का, याबाबत शंका असतानाच शेतकऱ्यांनी धीर एकवटून रेस्टॉरंटशी संपर्क साधला. त्यावेळी बहिरू शेठ यांनी कोणतीही शंका न घेता “तुमची बॅग आमच्याकडे सुरक्षित आहे, काळजी करू नका” असे सांगितले.
थोड्याच वेळात शेतकरी मल्हारी वाघ रेस्टॉरंटमध्ये पोहोचले असता त्यांना संपूर्ण ५० हजार रुपयांची बॅग जशीच्या तशी परत करण्यात आली. हे पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि त्यांनी बहिरू शेठ यांचे मनापासून आभार मानले.
गोसावी कुटुंबाकडून गेली सुमारे ५० वर्षे सिन्नर शहरात भजी, पाववडे यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवला जात आहे. वडिलांकडून मिळालेले संस्कार जपत बहिरू शेठ आणि त्यांचे कुटुंब आजही ग्राहकांशी नम्रतेने आणि प्रामाणिकपणे वागतात.
या प्रामाणिक कृतीची दखल घेत सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या हस्ते बहिरू शेठ यांचा शाल व टोपी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केशव गोजरे, भाऊसाहेब कांगणे, सूरज लोणारे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजच्या काळात १००-५०० रुपयांसाठीही अप्रामाणिक घटना घडत असताना, ५० हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणे हे खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. बहिरू शेठ यांचा हा प्रामाणिकपणा सिन्नर तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला असून “सॅल्यूट बहिरू शेठ” अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.






















