सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) नाशिक–पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील ढाब्यावर सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वावी पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत १६.९१२ किलो अफीम डोडा चुरा (पोपी स्ट्रॉ), अंदाजे २ लाख ५१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गोंदे फाटा येथील हॉटेल रेणुका माता राजस्थानी ढाबा येथे अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ६ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० ते ७ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत अंकीत वंशपती साकेत (वय २३, रा. गोंदे फाटा, मूळ मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून प्लास्टिकच्या गोणीत भरलेला १६.९१२ किलो वजनाचा अफीम डोडा चुरा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दुसरा संशयित शोभाराम चौधरी (रा. गोंदे) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात NDPS Act, १९८५ मधील कलम ८(क), १५(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन ढोमसे करीत आहेत.






















