गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी तब्बल १७ कोटी ४२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यात आमदार विजयसिंह पंडित यांना यश आले आहे. यापूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांनीही गेवराईच्या विकास कामांना प्राधान्य दिले होते. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणी यांच्या नेतृत्वाखालीही विकासाला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
विविध विकास कामांचा समावेश
या अंतर्गत मिरगाव ते पांढरी, रामा ५० ते गोविंदवाडी, सुतगिरणी चौक ते ताकडगाव पूल, रामा ५० ते कोल्हेर सिमेंट रस्ता, बोरीपिंपळगाव ते उमापूर आणि सिरसमार्ग ते शहाजानपूर या रस्त्यांच्या सुधारणा कामांचा समावेश आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गेवराई येथे पुर संरक्षण भिंत उभारण्याचे कामही करण्यात येणार आहे.
अतिरिक्त विकास कामांना देखील प्रारंभ
मुख्य कामांव्यतिरिक्त गोविंदवाडी येथे सुमारे १ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना, अंगणवाडी व शाळा खोल्यांसाठी २९ लाख रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहेत. तसेच सिरसमार्ग येथे अंगणवाडी इमारत, दत्त मंदिरासाठी सभामंडप, शाळा इमारत व स्मशानभूमी बांधकामासाठी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
या विकास कामांच्या शुभारंभासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
- सकाळी १०.३० – कोल्हेर फाटा
- सकाळी १०.४५ – सुतगिरणी चौक
- सकाळी ११.१५ – मिरगाव
- दुपारी १२.०० – गोविंदवाडी फाटा
- दुपारी १.३० – दत्त पार्क, गेवराई
- दुपारी ४.०० – बोरीपिंपळगाव
- सायं. ५.३० – सिरसमार्ग
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, जयदिप औटी, महेश दाभाडे, दिपक आतकरे, डॉ. आसाराम मराठे, किशोर कांडेकर, श्रीहरी पवार, कालिदास नवले, मुजीब पठाण, सुंदरसिंग राठोड, अनिल पवळ, खाजाभाई शेख, सचिन मोटे, प्रतापसिंह पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विकासाला मिळणार गती
या कामांमुळे गेवराई तालुक्यातील रस्ते आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. नवीन रस्ते जोडणीमुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासकामांना वेग आला असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






















