Times of Maharashtra Desk, Pune: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका केल्याने पक्षाने ही दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली पाटील-ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल पक्षाच्या धोरणांविरोद्ध जाणारी आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी वक्तव्ये वारंवार केल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. पक्षाच्या अंतर्गत बाबी आणि सहकारी नेत्यांवर जाहीर टीका केल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची तक्रार नेतृत्वाकडे करण्यात आली होती. याच तक्रारींच्या आधारावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
शिस्तभंगाची नोटीस मिळाल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीत त्यांनी आपल्या बाजूचे स्पष्टीकरण दिले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर समाज माध्यमांवर आणि माध्यमांसमोर थेट भाष्य केले होते. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये असलेले मतभेद या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांसमोर आले आहेत. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
शिस्तभंगाच्या नोटीसवर रुपाली पाटील-ठोंबरे काय उत्तर देतात आणि अजित पवार यावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून त्यांच्यावर कोणती पुढील कारवाई केली जाते किंवा त्यांना केवळ ताकीद देऊन हा विषय मिटवला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






















