ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा ग्रामपंचायतीने हा समज पार धुळीस मिळवला आहे. ज्या स्मशानभूमीच्या नावाखाली लोक जायलाही धजावत नसत, त्याच स्मशानभूमीच्या काळजात चक्क ३ हजार फळझाडांचे ‘नंदनवन’ फुलवून एकारा गावाने प्रशासनाला आणि समाजाला प्रत्यक्षात करून दाखवला आहे.
‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’तून केवळ रस्ते किंवा खड्डे खोदले जातात, हा समज एकारा ग्रामपंचायतीने खोडून काढला. या योजनेचा अत्यंत प्रकल्पासाठी वापर करत गावाने स्मशानभूमीच्या परिसरात फळबागांची निर्मिती केली आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांच्या जिद्दीतून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
फलोत्पादन आणि वन्यजीव संरक्षणाची जोड
केवळ वृक्षारोपण करून ही ग्रामपंचायत थांबली नाही, तर त्याला आयसीआयसीआय फाउंडेशनच्या तांत्रिक पाठबळाची जोड दिली. ‘फलोत्पादन मूल्य साखळी’ अंतर्गत येथे चिकूसह विविध फळा पिकावर भर देण्यात येत आहे. सोबतच, ‘प्रकल्प वन्य जीवन’ अंतर्गत या फळबागांचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
या ३ हजार फळझाडांमुळे भविष्यात ग्रामपंचायतीला हक्काचे उत्पन्न मिळणार असून, अनेक हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीसारख्या दुर्लक्षित जागेचा असा उत्पादक वापर करणे, हा ग्रामीण विकासातील एक मोलाचा मानला जात आहे.

आयसीआयसीआय फाउंडेशनने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सरकारी अनुदानावर डोळा ठेवून कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गर्दीत, एकारा ग्रामपंचायतीने ‘नवनिर्माणाचा ध्यास’ घेतलेला दिसतो. स्मशानभूमीच्या रुक्ष जागेवर हिरवेगार नंदनवन फुलवणे ही केवळ वृक्षलागवड नसून, ती ग्रामीण मानसिकतेत झालेली एक मोठी क्रांती आहे.
शासकीय योजनांचा निधी फक्त खर्च करायचा नसून तो समाजपरिवर्तनासाठी कसा वापरायचा, याचा आदर्श वस्तूपाठ एकारा ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. स्मशानभूमीच्या दुर्लक्षित जागेवर ३ हजार फळझाडांचे नंदनवन फुलवणे ही बाब प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. ‘मग्रारोहयो’ आणि ‘आयसीआयसीआय फाउंडेशन’च्या समन्वयातून उभा राहिलेला हा प्रकल्प तालुक्यासाठीच एक ‘रोल मॉडेल’ ठरेल. इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकल्प कामांतून गावाचा कायापालट करावा.
रवींद्र घुबडे सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी
स्मशानभूमीच्या नावाखाली लोक वर्षानुवर्षे तिथे जायला घाबरत होते, पण आम्ही त्याच जागेला गावाच्या प्रगतीचं केंद्र बनवलंय! लोक म्हणायचे शासकीय योजनेत फक्त खाबुगिरी चालते, पण आम्ही ‘मग्रारोहयो’चा पैसा मातीत पेरला आणि आज तिथे ३ हजार फळझाडांचं नंदनवन उभं आहे. आयसीआयसीआय फाउंडेशनच्या साथीने आम्ही ‘भयाचं’ रूपांतर ‘भवितव्यात’ केलं आहे. ज्यांना टीका करायची आहे त्यांनी खुशाल करावी, आम्ही आमचं काम स्मशानभूमीच्या काळजात उभं करून दाखवलंय. आता हीच फळझाडं आणि चिकूसह अनेक फळांचे शेती आमच्या गावाचं नाव तालुक्याच्या नकाशावर असेल
प्रशासक, ग्रामपंचायत एकारा






















