निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड–नाशिक–संभाजीनगर महामार्गावर पिंपळसजवळ घडलेल्या भीषण अपघातात आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने विद्यार्थ्याच्या आजीचाही मृत्यू झाल्याने चांदोरी परिसरावर दुहेरी दुःखाचे सावट पसरले आहे.
चांदोरी येथील पियुष प्रताप गायकवाड हा विद्यार्थी शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता आपल्या मित्रांसह मोटरसायकलने निफाडकडे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पियुष व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना पियुषची प्राणज्योत मालवली.
पियुषच्या अकाली निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेचा तीव्र धक्का बसल्याने त्याची आजी बब्या बाई गायकवाड (वय 70) यांचे रविवारी, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.
सलग तीन दिवसांत घडलेल्या या दोन दुःखद घटनांमुळे संपूर्ण चांदोरी गाव हळहळून गेले आहे. बब्या बाई गायकवाड या तमाशा कलावंत आणि वग सम्राट स्व. माधवराव गायकवाड यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातही शोक व्यक्त केला जात आहे.
या दुहेरी शोकांतिकेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






















