गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : समाजात वाढत्या तणाव, असंतोष आणि मानसिक क्लेशाच्या पार्श्वभूमीवर आत्मिक शांती व आध्यात्मिक शक्तीची गरज अधिक जाणवत आहे. अशा वेळी श्रीमद् भागवत कथा ही अंतर्मनाला ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी ठरते, असे प्रतिपादन कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, ईश्वर मानायचा नाही, तर जाणायचा आणि अनुभवायचा विषय आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामीच परमात्मा वास करतो. त्या चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक आहे. श्रीमद् भागवत कथेमुळे ही दिव्य अनुभूती प्राप्त होते.

दिव्य ज्योति जाग्रती संस्थान, शाखा पाथर्डी यांच्या वतीने बीड रोडवरील दसरा मैदान, गेवराई येथे दि. 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान दररोज सायंकाळी 4.30 ते रात्री 8.30 या वेळेत श्रीमद् भागवत कथाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेमध्ये सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या शिष्या सुश्री वैष्णवी भारतीजी मार्गदर्शन करीत आहेत.
कथेला प्रारंभ होण्यापूर्वी शनिवारी शहरातून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी दसरा मैदानावर कथा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली असून महिला व पुरुष भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
या सात दिवसीय ज्ञानयज्ञात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






















