तालुका (प्रतिनिधि जाबिर खान) :
दि. 10/05/2026 रोजी गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातून मा. पोलिस अधीक्षक श्री एम. रमेश सर यांच्या संकल्पनेतून व मा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा सो यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग सिरोंचा अंतर्गत पोलीस स्टेशन सिरोंचा, पोलीस स्टेशन असरअली, उप पोलीस स्टेशन बामणी, पोलीस स्टेशन पातागुडम, उप पोलीस स्टेशन झिंगानुर व उप पोलीस स्टेशन रेगुंठा यांच्या मार्फत “रस्ते अपघात शून्यावर आणण्याचा संकल्प” या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
सदर अभियानांतर्गत वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी वाहनांची वेगमर्यादा पाळणे, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करणे, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.
रॅलीदरम्यान रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी उपविभाग सिरोंचा अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन व उपपोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
अभियानादरम्यान नागरिकांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या –
1. मद्यपान करून वाहन चालवू नये.
2. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा.
3. हेल्मेटचा वापर करावा.
4. वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करावे.
गडचिरोली पोलिस दलामार्फत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.






















