जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात आलेले लोगो, पोस्टर आणि डिजिटल बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये “भावी आमदार” आणि “जिल्हाध्यक्ष” अशा पदांचा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत असून युवकांमध्ये याची विशेष चर्चा सुरू आहे.
राजकारणात नव्या प्रयोगांची चर्चा नेहमीच रंगत असते. त्यातच या आगळ्यावेगळ्या नावामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींनी याला विनोदी राजकीय मोहीम म्हटले आहे, तर काहींनी आगामी स्थानिक राजकारणाशी याचा संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, “कॉकरोच जनता पार्टी” या नावामागचा नेमका उद्देश काय, तसेच यामागे कोणती व्यक्ती किंवा संघटना कार्यरत आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील चर्चेमुळे हा विषय सध्या जळगावात चांगलाच गाजत आहे.
या निमित्ताने राजकीय घडामोडींमध्ये सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, येत्या काही दिवसांत या विषयावर आणखी चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















