गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचा दावा; कारवाईकडे पोलिसांची जाणीवपूर्वक डोळेझाक गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा, मटका, अवैध दारू आणि वाळू तस्करीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सपोनि सचिन इंगळे यांच्या कार्यकाळात या अवैध धंद्यांना आळा बसण्याऐवजी जणू राजाश्रयच मिळाल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. “पोलीस अधीक्षकांशी आपली जवळीक असल्याने कारवाई होणार नाही” अशी दर्पोक्ती करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई टाळली जात असल्याने, सपोनि इंगळे यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अवैध धंद्यांना मोकळे रान आणि धोक्यात आलेली शांतता.
चकलांबा परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील तीन महिन्यांत अवैध व्यवसायांवर वचक बसण्याऐवजी त्यांच्यात मोठी वाढ झाली आहे. खुलेआम चालणाऱ्या या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ओढली जात असून, ग्रामीण भागातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले न उचलल्यास भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरळेगावात दिवसाढवळ्या वाळू उपसा
सुरळेगाव आणि आसपासच्या परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. येथे दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे चकलांबा पोलिसांकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून कारवाईची अपेक्षा
सपोनि सचिन इंगळे हे वरिष्ठांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे स्थानिक पातळीवर कुणीही तक्रार केली तरी त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व गैरप्रकारांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
चकलांबा परिसरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.
सुरळेगाव येथील नियमबाह्य वाळू उपशाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या सपोनि सचिन इंगळे यांची सखोल चौकशी करून त्यांची येथून तत्काळ बदली करावी.






















