विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे भावपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य पंकज भुजबळ यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी “गोपीनाथ मुंडे अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. मुंडे साहेबांच्या कार्याचा आणि त्यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजन समाज, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांमधून आजही लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असून समाजकारण आणि राजकारणात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
कार्यक्रमाचे आयोजन विंचूर येथील मुंडेप्रेमी कार्यकर्त्यांनी केले होते. शेवटी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.






















