पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुणे वन विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचारी जालंदर पाटील यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी तक्रार करून हे आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, २०२५ मधील पूर्व पावसाळी वृक्षलागवड मोहिमेसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कंपोस्ट खत, व्हर्मी कंपोस्ट, साईड बंडिंग तसेच जेसीबीद्वारे करण्यात आलेल्या खोदकामाच्या कामांमध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा खर्च अधिक दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या कामांबाबत माहिती मिळवण्याचा आणि संबंधित ठिकाणांची पाहणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी संताप व्यक्त करत, “पोलिसांना बोलावून तुझ्यावर गुन्हा दाखल करीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, २०२४ मधील बदली प्रक्रियेतही आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या सर्व प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार, अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी यामुळे पुणे वन विभागातील कारभार चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.मात्र, हे सर्व आरोप तक्रारदारांकडून करण्यात आले असून, त्याबाबत वनसंरक्षक आशिष ठाकरे यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आरोप गंभीर असले तरी संबंधित अधिकाऱ्यांची बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे.
आता या गंभीर आरोपांची शासन स्तरावर दखल घेतली जाणार का, तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















