गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार महसूल प्रशासनाने सातत्यपूर्ण प्रयत्न करत बीड तालुक्यातील नाळवंडी – खांडे पारगाव या दोन गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा शेतरस्ता अखेर सर्वांसाठी खुला केला आहे . स्वातंत्र्यानंतर तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन प्रक्रिया , स्थानिक वाद आणि काही जमीनधारकांच्या आक्षेपांमुळे रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने दोन्ही गावांतील शेतकरी , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे . महसूल प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे अनेक दशकांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या समन्वयातून बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून प्रत्यक्ष तीन वेळा घटनास्थळी भेट दिली . संबंधित जमीनधारक , ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कायदेशीर तरतुदी समजावून सांगितल्या . महसूल अभिलेख , गाव नकाशे , जुन्या नोंदी आणि न्यायालयीन बाबींचा अभ्यास करून सर्व संबंधितांना विश्वासात घेण्यात आले . मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) आणि महसूल कर्मचाऱ्यांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व प्रत्यक्ष पंचनामे करून या कामात महत्त्वाची भूमिका बजावली . संवाद , संयम आणि लोकसहभागाच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला .
नाळवंडी व खांडे पारगाव या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता म्हणजे जीवनवाहिनीच होता . दोन्ही गावांतील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये कायमस्वरूपी वस्ती करून राहतात . शेतीमालाची वाहतूक , विद्यार्थ्यांचे शिक्षण , रुग्णांची ने-आण , कृषी साहित्याची वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार यासाठी हा मार्ग अत्यंत आवश्यक होता . मात्र काही जमीनधारकांच्या आक्षेपांमुळे हा रस्ता अनेक वर्षे बंद राहिला . परिणामी नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता . विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर चिखल साचत असल्याने लहान मुले शाळेत जाऊ शकत नव्हती . एखादा रुग्ण गंभीर आजारी पडल्यास अथवा गर्भवती महिलेला तातडीने दवाखान्यात नेण्याची वेळ आल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत होते . बैलगाड्या , ट्रॅक्टर आणि इतर वाहनेही या मार्गावरून जाऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते .
नाळवंडी हे परिसरातील प्रमुख गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र , पशुवैद्यकीय दवाखाना , शासकीय कार्यालये , बँका , शैक्षणिक संस्था आणि मोठी बाजारपेठ आहे . त्यामुळे खांडे पारगावसह परिसरातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार नाळवंडीशी जोडलेले आहेत . रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त अंतर पार करावे लागत होते . शेतीमाल वेळेत बाजारात पोहोचत नव्हता . शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत होत्या . अनेक वेळा रुग्णवाहिकेलाही या भागात पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता . त्यामुळे हा प्रश्न केवळ शेतरस्त्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण विकास , शिक्षण , आरोग्य आणि शेतीशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय बनला होता .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रश्नाकडे केवळ महसुली प्रकरण म्हणून न पाहता सामाजिक दृष्टीकोनातून विचार केला . त्यांनी तीन वेळा प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली . कोणाच्याही हक्कावर गदा न आणता कायद्याच्या चौकटीत सर्वांना न्याय मिळेल , अशी भूमिका घेतली . सातत्याने समन्वय बैठका घेऊन परस्पर संवादातून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले . त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर सुटला आणि दोन्ही गावांतील नागरिकांसाठी रस्ता कायमस्वरूपी खुला झाला .
रस्ता खुला झाल्यानंतर दोन्ही गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले . ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विशेष आभारपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली . ग्रामस्थांनी दिलेल्या आभारपत्रात ” पन्नास वर्षांपासून रखडलेला प्रश्न आपल्या संवेदनशील कार्यपद्धतीमुळे मार्गी लागला असून हजारो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे ” , असा उल्लेख करण्यात आला आहे . प्रशासनाने लोकहिताला प्राधान्य दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .
यावेळी नाळवंडीचे सरपंच राजेंद्र राऊत यांच्यासह निलेश राऊत , महेंद्रकुमार म्हेत्रे , नारायण राऊत , अशोक जाधव , शंकर म्हेत्रे , शिवाजी राऊत , प्रताप जाधव , धर्मा राऊत , गोकुळ राऊत , कृष्णा काळे , दामू सपकाळ , ज्ञानेश्वर काळे , दत्ता जाधव तसेच दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी , ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते . उपस्थितांनी महसूल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली .
रस्ता सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर , हार्वेस्टर , कृषी अवजारे , बियाणे , खते आणि शेतीमालाची वाहतूक सहज करता येणार आहे . विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र , पशुवैद्यकीय दवाखाना , बाजारपेठ आणि विविध शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे . विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अन्य सेवा वेळेत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार आहे .
महसूल प्रशासनाने अशा प्रकारच्या प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेतली असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे . लोकसहभाग , कायदेशीर प्रक्रिया आणि सकारात्मक संवाद यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अशक्य वाटणारा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले असून नाळवंडी – खांडे पारगाव शेतरस्ता हा ग्रामीण भागातील लोकाभिमुख , परिणामकारक आणि संवेदनशील प्रशासनाचा आदर्श ठरला आहे






















