ब्रह्मपुरी: (प्रतिनिधी) रुपेश देशमुख
ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करून ब्रह्मपुरी शहरात बेकायदेशीररित्या नॉन-स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड आणि मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे तयार करून विकणाऱ्या रॅकेटचा वैधमापनशास्त्र विभाग आणि पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी येथील व्यावसायिक आशिष मधुकर पारधी आणि सुरज मधुकर पारधी यांच्यावर कॉपीराइट कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत अंदाजे २०० बनावट आणि अप्रमाणित वजन काटे व मापे जप्त करण्यात आली आहेत.
नागपूर येथील नामांकित ‘श्री साई स्केल कंपनी’चे संचालक यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपी आशिष पारधी आणि सुरज पारधी हे ब्रह्मपुरी येथे ‘एस.ए.आय. वेइंग सर्व्हिसेस’ ‘साई इलेक्ट्रॉनिक्स स्केल’ आणि ‘एस.ए. सर्व्हिसेस’ या नावांनी आस्थापने चालवत होते. या दुकानांमध्ये कोणत्याही कायदेशीर मंजुरीशिवाय निकृष्ट दर्जाचे वजन काटे आणि मापे तयार केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे, ‘श्री साई स्केल कंपनी’च्या मालकीच्या अधिकृत ‘टीएम सनसुई’ या ब्रँडचे हुबेहूब बनावट स्टिकर्स तयार करून ते या अप्रमाणित काट्यांवर चिकटवले जात होते. नामांकित ब्रँडच्या नावाखाली हे बनावट काटे ग्राहकांच्या गळ्यात मारून मागील दोन वर्षांपासून हा काळाबाजार सुरू होता.
१ जून २०२६ रोजी वैधमापनशास्त्र विभाग आणि ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने आरोपींच्या ठिय्यांवर एकाच वेळी धाड टाकली. या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बनावट स्टिकर्स, फॅब्रिकेटेड वजन काटे आणि बेकायदेशीर साहित्य आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत अंदाजे २०० अप्रमाणित वजन-मापे जप्त केली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.
या गंभीर फसवणुकीप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत १६ जून २०२६ रोजी आरोपी आशिष पारधी व सुरज पारधी यांच्याविरुद्ध कॉपीराइट कायदा, १९५७ चे कलम ६३, ६७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) व ३१६(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, या अवैध व्यवसायाचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, इतर राज्यांमधील काही अवैध उत्पादक आणि पुरवठादार देखील यात सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यास आणखी काही कलमांचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मोठ्या कारवाईनंतर वैधमापनशास्त्र विभाग सतर्क झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण तहसील आणि ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारच्या बेकायदेशीर वजन काट्यांची निर्मिती, दुरुस्ती किंवा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी लवकरच एक व्यापक आणि विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
“व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेल्या अप्रमाणित वजन-मापांची किंवा वजन काट्यांची खरेदी करू नये. खरेदी करताना ते प्रमाणित आणि वैधमापनशास्त्र विभागाद्वारे मंजूर आहेत का, याची खात्री करावी. कोणत्याही व्यक्तीकडून अशा प्रकारचा गैरप्रकार किंवा संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास, नागरिकांनी तात्काळ उपनियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग, चंद्रपूर किंवा सहनियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी,” असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





















