गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पंप संचावर ९० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी महापोकरा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
पात्र शेतकऱ्यांनी शासनाच्या महापोकरा पोर्टल (dbt.mahapocra.gov.in) वर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. तसेच सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) मार्फतही अर्ज भरता येणार आहेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.
योजनेचा लाभ कोणाला? पात्रता व अटी अशा…
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा गडचिरोली जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या ५३२ गावांपैकी एका गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असावा. याशिवाय सिंचनासाठी विहीर, बोअरवेल, नदी-नाला किंवा ओढा यांसारखे पाण्याचे उपलब्ध स्रोत असणे आवश्यक आहे.
अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी करून अनुदान वितरण केले जाईल. परंतु यासाठी शेतकऱ्यांना पहिल्यांदा साहित्य खरेदी करून बिल सादर करावे लागणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






















