सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला मोठी चालना मिळत आहे. जोगलटेंभी, लोणारवाडी आणि कासारवाडी येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जात असून, अधिक नफा देणाऱ्या विदेशी भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांची निवड, आधुनिक लागवड तंत्र, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मल्चिंग, कीड-रोग एकात्मिक व्यवस्थापन, काढणीनंतरची हाताळणी तसेच बाजारपेठेचे नियोजन याबाबत प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक परतावा मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार व अनिल दातीर, उपकृषी अधिकारी रणजीत आंधळे, बाळासाहेब देठे, बाबासाहेब जोशी, सहाय्यक कृषी अधिकारी योगिता घोरपडे, दिव्या भोर, चेतन नागरे तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आत्मा योजनेचा उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ घडवून आणणे हा आहे. सिन्नर तालुक्यातील विदेशी भाजीपाला शेती शाळांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी प्रात्यक्षिकांमधून प्रेरणा घेऊन या पिकांची लागवड सुरू करत आहेत.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सिन्नर तालुका विदेशी भाजीपाला उत्पादनाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत असून, भविष्यात या पिकांचे क्षेत्र वाढवून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सिन्नरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.






















