सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने प्रथम वर्ष पदवी स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आधारित पदवी अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रणाली विषयक मार्गदर्शन व उद्बोधन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. संदीप भाबड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत पदवी अभ्यासक्रमाची रचना, श्रेयांक (क्रेडिट) प्रणाली, मूल्यमापन पद्धती तसेच शाखानिहाय व वर्गनिहाय अभ्यासक्रमातील बदलांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सोमेश्वर बलक यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे स्वरूप, विषयांची रचना आणि प्रभावी अभ्यास नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. प्रतिक कोळगे, प्रा. निलेश वाकचौरे, प्रा. विजय कांगणे, प्रा. रामनाथ मेंगाळ, प्रा. समाधान कांडेकर, प्रा. श्रीमती आरती बुरकूल यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत करण्यात आले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिक कोळगे यांनी केले.






















