सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ (पराग प्रकाश) वाजे यांनी सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
यावेळी खासदार वाजे यांनी बाराव्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या मुख्य शिखरावरील तसेच नंदी मंडपावरील काही दगडी शिळा सैल झाल्याने दुर्घटनेचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. श्रावण महिन्यात मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक येत असल्याने तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाची कामे हाती घेण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच गोंदेश्वर मंदिरातील वर्षातून दोनदा – मार्च आणि सप्टेंबर महिन्यात – सूर्योदयाच्या किरणांचा थेट शिवलिंगावर पडणारा दुर्मिळ ‘सूर्याभिषेक’ हा स्थापत्य व खगोलशास्त्रीय वारसा जपण्यासाठी मंदिराच्या पूर्व बाजूस उंच इमारती किंवा इतर अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नियोजनबद्ध निर्बंध लागू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मंदिर परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. गोंदेश्वर मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि ‘सूर्याभिषेक’ची माहिती देणारे आकर्षक माहितीफलक उभारावेत तसेच मंदिराच्या गौरवार्थ स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने विचारात घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय मंदिराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीपैकी केवळ दीड कोटी रुपये खर्च झाल्याची बाब मांडत उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून प्रलंबित संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटक सुविधांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे केली.






















