तालुका (प्रतिनिधी जाबिर खान) सिरोंचा तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. थोड्याशा पावसातही या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे. जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेला हा राष्ट्रीय महामार्ग दरवर्षी पावसाळ्यात निकृष्ट कामे व कथित भ्रष्टाचारामुळे उध्वस्त होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
इंद्रावती नदीकाठी वसलेल्या अनेक गावांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ देखील पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. छत्तीसगडची सीमा जवळ असल्यामुळे बीजापूरचे काँग्रेसचे आमदार यांनी दरवर्षी पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्य केले असून, राहत साहित्याचे वितरणही केले आहे.
सन २०२३–२४ मध्ये सोमनपल्ली येथील ग्रामस्थांनी आमदार विक्रम मंडावी यांच्याकडे विनंती करत, सोमनपल्ली ते पातागुडम हा परिसर छत्तीसगडमध्ये समाविष्ट करण्याची मागणीही केल्याचे सांगितले जाते.
या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेक पत्रकारांनी वेळोवेळी जनतेचा आवाज प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), सिरोंचा यांच्याकडे आहे. मात्र, अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आज सोमनपल्ली गावाजवळ अनेक वाहने चिखल व पाण्यात अडकून पडली असून, त्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील प्रमुख नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून कायमस्वरूपी दिलासा देण्याची मागणी केली आहे.























