जळगाव जिल्ह्याला प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व; आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प
जळगाव | प्रतिनिधी – विनोद पवार
भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, जळगावचे आदिवासी नेते तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याला आदिवासी मोर्चाच्या प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व मिळाले आहे.
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि मोर्चाचे प्रभारी आमदार योगेश सागर यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीची रचना करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अनुभवी तसेच युवा कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारिणीत संधी देताना संघटनात्मक आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रदेश पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रल्हाद सोनवणे हे नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष असून, जळगाव शहर व जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमागे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार रमेशदादा पाटील तसेच आदिवासी मोर्चाचे प्रदेश संयोजक ॲड. किशोर काळकर यांचे मार्गदर्शन असल्याचे सांगण्यात आले.
शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचा निर्धार
प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. तसेच संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, युवक व महिलांना संघटनेशी जोडणे आणि उत्तर महाराष्ट्रात आदिवासी मोर्चाचे कार्य व्यापक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
सोनवणे यांच्या नियुक्तीचे भाजपा नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपा आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






















